इंदापूर तालुक्यातील निमसाखर ते घोरपडवाडी–सराफवाडी मार्गावरील रस्त्यालगत महावितरणकडून उभारण्यात आलेल्या विनापरवाना व धोकादायक विद्युत खांबांमुळे परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत असून, “महावितरण कोणाच्या तरी वंशाचा दिवा विझल्यानंतरच जागे होणार का?” असा संतप्त सवाल भारतीय जनता पार्टीचे महामंत्री सुरज पिसे यांनी उपस्थित केला आहे.

सार्वजनिक बांधकाम उपविभाग, भिगवण यांच्या अधिकृत पत्रामध्ये संबंधित विद्युत खांब हे कोणतीही पूर्वपरवानगी न घेता उभारण्यात आल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. तसेच सदर खांब हे दळणवळणासाठी धोकादायक ठरत असून भविष्यात अपघात झाल्यास संबंधित विभाग जबाबदार राहील, असा गंभीर इशाराही सार्वजनिक बांधकाम विभागाने महावितरणला दिलेल्या स्मरणपत्रामध्ये देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर कामासाठी कोणतीही परवानगी अथवा ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विनापरवाना पद्धतीने विद्युत खांब उभारण्यात आल्याची बाब अधिकृत कागदपत्रांमधून समोर आली आहे.

मौजे निमसाखर येथे इयत्ता १२ वीपर्यंत शाळा असून सदर रस्त्यावरून दररोज शेकडो विद्यार्थी ये-जा करतात. अशा परिस्थितीत रस्त्यालगत धोकादायक पद्धतीने उभारण्यात आलेले विद्युत खांब विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करत असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.दरम्यान, या प्रकरणात भारतीय जनता पार्टीचे महामंत्री सुरज पिसे यांनी सातत्याने पाठपुरावा करत संबंधित विभागांना वारंवार लेखी तक्रारी व स्मरणपत्रे दिली आहेत. मात्र, अनेक महिने उलटूनही महावितरण प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत बोलताना सुरज पिसे यांनी सांगितले की, “नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या धोकादायक विद्युत खांबांवर तात्काळ कार्यवाही झाली नाही तर आंदोलन व उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल. तसेच या संपूर्ण प्रकरणाची तक्रार महाराष्ट्र राज्याचे मा.श्री.देवेंद्र फडणवीस जी मुख्यंमत्री तथा ऊर्जा मंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.श्री.शिवेंद्रराजे भोसले जी यांच्याकडे लवकरच दाखल करण्यात येणार आहे.”

सदर प्रकरणात महावितरण प्रशासन आता प्रत्यक्ष कार्यवाही करते की पुन्हा केवळ पत्रव्यवहारापुरतेच प्रकरण मर्यादित राहते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!