गणेश नारंग पुणे जिल्हा प्रतिनिधी Growing Maharashtra

चिंचवड गावातील कमला कॉर्नर परिसरात सार्वजनिक रस्ता आणि पदपथावर सुरू असलेल्या अतिक्रमणाविरोधात नागरिकांनी महानगरपालिका तसेच पोलिस प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही प्रभावी आणि कायमस्वरूपी कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नागरिकांनी दिनांक 25 मार्च 2025 रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सारथी पोर्टलवर अतिक्रमणाबाबत तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीला MW26014 हा टोकन क्रमांक देण्यात आला. महानगरपालिकेच्या नोंदीत ही तक्रार “Closed” दाखविण्यात आली असली तरी प्रत्यक्ष ठिकाणी अतिक्रमण आजही सुरू असल्याचे ताज्या छायाचित्रांमधून स्पष्ट होत आहे.

या प्रकरणी नागरिकांनी चिंचवड पोलिस ठाण्यात तक्रार देऊन NC (Non-Cognizable Report) नोंदविली आहे. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली असली तरी संबंधित अतिक्रमण हटविण्यासाठी अथवा नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

कमला कॉर्नर परिसरातील काही व्यावसायिक आस्थापनांनी दुकानांसमोर सार्वजनिक जागेत टेबल-खुर्च्या, स्टूल, जाहिरात फलक, कुंड्या तसेच इतर साहित्य ठेवले आहे. याशिवाय रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर दुचाकी पार्किंग होत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. परिणामी रस्त्याची रुंदी कमी झाली असून वाहनचालक, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अधूनमधून अतिक्रमणविरोधी कारवाई केली जात असली तरी ती केवळ औपचारिक स्वरूपाची ठरत आहे. काही वेळातच किंवा काही दिवसांत पुन्हा अतिक्रमण सुरू होत असल्याने प्रशासनाच्या कारवाईचा कोणताही परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे तक्रारींची केवळ कागदोपत्री पूर्तता केली जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे, महानगरपालिकेकडे तक्रार दाखल करून, पोलिसांकडे NC नोंदवून आणि वारंवार पाठपुरावा करूनही परिस्थिती जैसे थे असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी संबंधित विभागांनी संयुक्त कारवाई करून सार्वजनिक रस्ता व पदपथ अतिक्रमणमुक्त करावा तसेच भविष्यात पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

अन्यथा वरिष्ठ प्रशासन, लोकप्रतिनिधी तसेच न्यायालयीन स्तरावर दाद मागण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

छायाचित्र ओळ : चिंचवडगावातील कमला कॉर्नर परिसरात सार्वजनिक रस्ता व पदपथ व्यापून टेबल-खुर्च्या, जाहिरात फलक आणि दुचाकी पार्किंग करण्यात आल्याने वाहतूक व पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत असल्याचे दृश्य.

संलग्नक :
१) PCMC तक्रार (टोकन क्र. MW26014) प्रत
२) चिंचवड पोलिस ठाण्यातील NC प्रत
३) अतिक्रमणाचे ताजे छायाचित्रे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!