नागपूर प्रतिनिधी
नागपूर येथील मंडल यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी हा खुलासा केला. ते म्हणाले, “मला आठवतंय, विधानसभा निवडणुकीआधी दिल्लीत दोन व्यक्ती मला भेटायला आल्या. त्यांची नावं आणि पत्ते माझ्याकडे नाहीत. त्यांनी मला सांगितलं की, महाराष्ट्रात २८८ जागांपैकी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो. मला आश्चर्य वाटलं. निवडणूक आयोगाबद्दल माझ्या मनात यत्किंचितही शंका नव्हती, त्यामुळे मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं.”
“त्या व्यक्तींनी राहुल गांधी यांच्यासमोरही त्यांचं म्हणणं मांडलं. पण आम्ही दोघांनीही ठरवलं की, अशा गोष्टींमध्ये पडायचं नाही. लोकांमध्ये जाऊन त्यांचा जो निर्णय असेल तो स्वीकारायचा,” असे पवार यांनी स्पष्ट केले.
राजकीय प्रतिक्रिया: महायुती आणि विरोधकपवार यांच्या या दाव्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात खळबळ माजली आहे. महायुती (भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी) मधील नेत्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी पवारांचा दावा ‘बालिश’ आणि ‘हास्यास्पद’ असल्याचे म्हटले आहे.
ते म्हणाले, “पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने असे दावे करणं आश्चर्यकारक आहे. जर दोन व्यक्ती त्यांना भेटल्या होत्या, तर त्यांनी निवडणूक आयोग किंवा पोलिसांकडे तक्रार का केली नाही? उलट त्यांनी त्या व्यक्तींना राहुल गांधी यांच्याकडे नेलं, याचा अर्थ काय?”राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र पवार यांच्या दाव्याला दुजोरा दिला.
ते म्हणाले, “मला माहिती आहे की, दोन व्यक्ती पवार साहेबांकडे गेल्या होत्या. त्यांनी मतदार याद्या हाताळून १६० जागा जिंकून देण्याचा दावा केला होता. पण पवार साहेबांनी यावर विश्वास ठेवला नाही आणि हा विषय पुढे नेला नाही.”
