Growing Maharashtra : इंदापूर प्रतिनिधी
इंदापूर | २५ ऑगस्ट २०२५
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वाधिक गाजत असलेला मुद्दा म्हणजे माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ वाद. विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान कोकाटे मोबाईलवर ‘रमी’ गेम खेळताना कॅमेऱ्यात कैद झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ थेट सोशल मीडियावर शेअर केला. या प्रकारामुळे मोठा राजकीय गदारोळ उठला असून, कोकाटे यांनी प्रत्युत्तरादाखल रोहित पवार यांच्यावर मानहानीची नोटीस बजावली आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर आणि कोकाटेंवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. “तुमच्याच माणसाने व्हिडिओ काढला, पण नोटीस बिचाऱ्या रोहित पवारांना पाठवली. हे म्हणजे परीक्षा देताना दुसऱ्याचा पेपर कॉपी करणाऱ्याला बक्षीस देणं आणि प्रामाणिक शिकणाऱ्याला शिक्षा करणं,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
याच मुद्द्यावर बोलताना सुळे यांनी कॅबिनेटमध्ये कोकाटेंच्या खात्यात झालेल्या बदलावर देखील सरकारला धारेवर धरलं. कृषीखाते काढून टाकून कोकाटेंच्या हातात क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय देण्यात आलं यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं, “गेम खेळल्याबद्दल सरकारने बक्षीसच दिलं. रमी खेळणाऱ्याला खेळाचं मंत्रालय देणं हे या सरकारचं तर्कशास्त्र आहे.” त्यांच्या या वक्तव्याने सभागृहातील हास्याचा स्फोट तर झाला, पण त्यामागे सरकारच्या धोरणांवरचा उपरोध लपलेला नव्हता.
सुळे यांच्या या टीकेमुळे हे स्पष्ट होतं की राज्य सरकारकडून सत्तेचा वापर टीकाकारांना गप्प करण्यासाठी केला जात आहे. शेतकऱ्यांचे खरे प्रश्न बाजूला ठेवून, वरवरच्या मुद्द्यांवर सरकारचं लक्ष केंद्रित झाल्याची टीका त्यांनी केली. सरकारच्या निर्णय प्रक्रियेत दुटप्पीपणा असल्याचा थेट आरोप करत त्यांनी सांगितलं की चुकीचं करणाऱ्यांना संरक्षण आणि टीका करणाऱ्यांना शिक्षा हीच या यंत्रणेची दिशा आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर सुळे यांच्या टीकेने राज्याचं राजकारण तापवलं आहे. सोशल मीडियावरही “खेळ खातं” या उपरोधिक भाष्याची चांगलीच चर्चा रंगली असून, अनेकांनी सरकारच्या निर्णयशक्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. “रमी खेळणाऱ्याला मंत्रालय” ही सुळे यांची टीका सध्या राजकीय वर्तुळात आणि जनतेत जोरात पसरते आहे.
बातमी व जाहिरातसाठी संपर्क : 9011639163 (Only Whats App)
