Growing Maharashtra पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी गणेश नारंग
पिंपरी-चिंचवड : मानवतेचा उत्तम नमुना घडला नाशिक फाटा परिसरात. नामवंत सायबर स्पेशालिस्ट वकील ॲड. कुंदन कांतिलाल कुवर आणि त्यांचे बंधू कुलभूषण कुवर यांच्या सतर्कतेमुळे रस्त्याकडेला कपड्यात गुंडाळून टाकलेले एक महिन्याचे नवजात बाळ जीवदान मिळाले. पोलिसांच्या त्वरित मदतीने बाळाला वैद्यकीय उपचार मिळाले असून, सध्या ते पूर्णपणे सुरक्षित आहे.
घटना रात्री उशिराची. ॲड. कुंदन कुवर आणि कुलभूषण कुवर हे एका कार्यक्रमानंतर घरी परतत असताना नाशिक फाटा भागात रस्त्याच्या कडेला बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी लगेच गाडी थांबवली आणि जवळ जाऊन पाहणी केली. कपड्यात गुंडाळलेले बाळ फक्त एक महिन्याचे असल्याचे लक्षात येताच परिसरात चौकशी केली. पालकांचा कुठेच मागमूस नव्हता. गंभीर परिस्थिती ओळखून त्यांनी तात्काळ पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बाळाला काळजीपूर्वक उचलले आणि औंध जिल्हा रुग्णालयात नेले. वैद्यकीय तपासणीत बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे निष्पन्न झाले. विशेष बाब म्हणजे, बाळाचा जन्मही याच रुग्णालयात झाल्याचे उघड झाले.

पोलिसांनी बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी तपास मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, ॲड. कुंदन कुवर यांनी आपले कायदेशीर ज्ञान वापरून परिस्थिती शांततेने हाताळली. बालकाच्या हक्कांबाबत मार्गदर्शन करत त्यांनी बालकल्याण समितीशी संपर्क साधला. कुलभूषण कुवर यांनी पोलिसांशी समन्वय साधत बाळाला सुरक्षितस्थळी पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या बाळ कोरेगाव पार्क येथील संगोपन संस्थेत आहे. ते साडेतीन महिन्यांचे होईपर्यंत तेथे राहील, नंतर योग्य पुनर्वसन केले जाईल.

“कायद्याची ताकद आणि माणुसकीचा भाव एकत्र आला की अनेक जीव वाचतात. पोलिसांची सहृदयता आणि तत्परता यामुळे हे बाळ सुरक्षित राहिले,” असे ॲड. कुंदन कुवर यांनी सांगितले. ॲड. कुंदन कुवर हे सायबर कायदेतज्ज्ञ असून, समाजातील दुर्बल घटकांसाठी नेहमी कार्यरत राहतात. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव आणि मदतीची तयारी शहरात प्रसिद्ध आहे. कुलभूषण कुवर यांची साथही या घटनेत मोलाची ठरली.
पोलिसांच्या संवेदनशील हस्तक्षेपामुळे एक निरपराध जीव वाचला, ज्यामुळे कायद्यावरील आणि माणुसकीवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. ही घटना समाजासाठी प्रेरणादायी ठरली असून, नागरिकांमध्ये समाधान आणि अभिमानाची लाट उसळली आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क👇🏻
✒️ गणेश नारंग (पिंपरी चिंचवड) प्रतिनिधी :- 8793981432
