Growing Maharashtra : अहिल्यानगर प्रतिनिधी
📍 अहिल्यानगर ,12 ऑक्टोबर 2025
अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या “दिवाळीत फक्त हिंदूंकडून खरेदी करा” या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या वक्तव्यावर पक्षातील वरिष्ठ नेते नाराज असून जगताप यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर “संग्राम जगताप यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे” अशी काही सोशल मीडियावरील अफवा पसरली असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृतपणे अशी कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे की, “अशा प्रकारची विधाने पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधात आहेत. प्रत्येक धर्माचा सन्मान राखणं हे आमचं तत्त्व आहे.” पक्षाच्या शिस्तपालन समितीकडून या प्रकरणावर चौकशी सुरू असून, लवकरच निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, संग्राम जगताप यांनी आपल्या वक्तव्याबाबत काही माध्यमांशी बोलताना तो संदर्भ चुकीचा घेतला गेल्याचं स्पष्टीकरण दिलं. मात्र, विरोधकांकडून त्यांच्या विधानावर जोरदार टीका होत असून सोशल मीडियावरही या प्रकरणाची मोठी चर्चा आहे.
