Growing Maharashtra

PCMC : प्रतिनिधी गणेश नारंग

पिंपरी-चिंचवड : महानगरपालिका निवडणुकीच्या (PCMC Election 2026) तोंडावर शहरात राजकीय हिंसाचाराचा भयानक प्रकार घडला आहे. प्रभाग क्रमांक २१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला उमेदवार प्रियांका सुनील कुदळे यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात दगडफेक, मारहाण, अश्लील शिवीगाळ, जीवे मारण्याच्या धमक्या आणि महिलेवर विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेच्या माहितीनुसार, मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात व्यक्ती (ज्यांना राष्ट्रवादी कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते असल्याचा दावा करत आहेत) घरात घुसखोरी करून हल्ला केला. घरातील सदस्यांवर हल्ला, वृद्ध महिलांना ढकलणे, तरुणाला मारहाण आणि दुचाकी वाहनांचे नुकसान करण्यात आले. ३३ वर्षीय डॉक्टर असलेल्या प्रियांका कुदळे यांनी स्वतः पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

घटनेचा व्हिडीओ पुरावा पोलिसांकडे!
तक्रारीत सांगण्यात आले आहे की, हल्लेखोरांनी अश्लील भाषा वापरली, धमक्या दिल्या आणि दहशत निर्माण केली. या प्रकरणात CCTV फुटेज आणि व्हिडीओ पुरावा पोलिसांना सादर करण्यात आला असून, त्याच्या आधारे तपास सुरू आहे. संबंधित व्यक्तींविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे प्रभाग २१ परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पक्षाने म्हटले आहे की, “लोकशाही प्रक्रियेत अशा हिंसक घटनांना कोणतीही जागा नाही. निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना धाब्यावर बसवण्याचा हा कायरपणाचा प्रयत्न आहे!”

प्रियांका कुदळे कोण?
प्रियांका सुनील कुदळे या प्रभाग २१ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत. भाजपच्या उषा संजोग वाघेरे पाटील यांच्याशी त्यांची थेट लढत आहे. निवडणुकीच्या (१५ जानेवारी २०२६) अगोदर ही घटना घडल्याने राजकीय वातावरण आणखी चिघळले आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गट यांनी पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र युती केली असताना, ही घटना महायुतीतील तणाव वाढवणारी ठरू शकते.

पोलिसांनी सांगितले की, “सखोल तपास सुरू आहे. दोषींना कायद्याच्या कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.” सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे, तर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

निवडणुकीला गालबोट!
ही घटना पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत हिंसाचाराची पहिली मोठी घटना ठरली आहे. शहरातील राजकीय वातावरण तापले असून, मतदार आणि उमेदवारांमध्ये भीती पसरली आहे. लोकशाहीला कलंक लावणाऱ्या या प्रकाराची कठोर चौकशी आणि कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!