Growing Maharashtra

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : गणेश नारंग

पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक २२ मधील निकालाने भाजपच्या चुकीच्या निर्णयांची किंमत किती महागात पडू शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

भाजपने अनुभवी व तळागाळात मजबूत पकड असलेले ॲड. मंगेश मच्छिंद्र नढे यांना उमेदवारी नाकारली आणि त्याच निर्णयामुळे आज भाजपला मोठे राजकीय नुकसान सहन करावे लागले.

तिकीट नाकारल्यानंतर ॲड. मंगेश नढे यांनी शिवसेनेच्या चिन्हावर निवडणुकीत उडी घेतली. ही लढत केवळ “मैत्रीपूर्ण” नव्हती, तर भाजपसाठी धोक्याची घंटा ठरली. नढे यांनी तब्बल ३९८२ मते घेत बंडखोरीची ताकद दाखवून दिली. ही मते भाजपची पारंपरिक मते होती, हे वास्तव नाकारता येणार नाही.

विशेष म्हणजे, भाजपचे ३ उमेदवार प्रभाग २२ मधून विजयी झाले असले, तरी नढे यांच्या बंडखोरीमुळे भाजपचा संपूर्ण पॅनल विजयी होण्याचे स्वप्न अपुरे राहिले. याच संधीचा फायदा घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष कोकणे हे ३२०९ मतांनी विजयी झाले. हा विजय भाजपच्या विरोधकांचा नसून, भाजपच्या आतल्या गोंधळाचा परिणाम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राजकीय विश्लेषकांचे स्पष्ट मत आहे की, भाजपने जर ॲड. मंगेश नढे यांना वेळेत तिकीट दिले असते, तर प्रभाग २२ मधील पूर्ण पॅनल विजयी झाला असता, राष्ट्रवादी काँग्रेसला संधीच मिळाली नसती, आणि भाजपचे हे लाजिरवाणे नुकसान टळले असते.

स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आता तीव्र नाराजी आहे. “ज्याने पक्ष वाढवला, त्यालाच डावलले आणि बाहेरच्यांना संधी दिली” अशी उघड टीका भाजप नेतृत्वावर होत आहे. प्रभाग २२ चा निकाल हा फक्त निवडणुकीचा पराभव नाही, तर भाजपच्या उमेदवार निवड प्रक्रियेवर लागलेले प्रश्नचिन्ह आहे.बंडखोरी दुर्लक्षित केली, त्याची किंमत पक्षाला मोजावी लागली आणि प्रभाग २२ हे त्याचे जिवंत उदाहरण ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!