Growing Maharashtra पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : गणेश नारंग
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ६ मधील सदगुरुनगर परिसरात नुकतेच एक नवीन प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. या प्रवेशद्वाराला ‘जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज’ यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष श्री. जयदीप करपे यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
श्री. करपे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “सदगुरुनगर परिसरातील नव्या प्रवेशद्वाराचे बांधकाम पूर्ण झाले असून, परिसराची ओळख निर्माण व्हावी तसेच रहिवाशांना आणि बाहेरून येणाऱ्या नागरिकांना पत्ता सांगताना सोयीसाठी या प्रवेशद्वाराला योग्य असे नाव असणे गरजेचे आहे.”
त्यांनी पुढे म्हटले आहे की, “सदगुरू म्हणजे श्रद्धा, आदर, ज्ञान, मार्गदर्शन व भक्तिभाव यांचे प्रतीक आहेत. त्यामुळे ‘सदगुरुनगर’ या नावाला साजेसे आणि परिसराच्या आध्यात्मिक परंपरेला अधोरेखित करणारे नाव म्हणजेच ‘जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज प्रवेशद्वार’ हेच योग्य ठरेल.”
स्थानिक रहिवाशांकडूनही या मागणीचे स्वागत करण्यात आले आहे. अनेक नागरिकांनी सांगितले की, अशा नामकरणामुळे परिसराला ओळख मिळेल आणि सांस्कृतिक वारसा जपला जाईल.
जयदीप करपे यांनी महानगरपालिकेकडे विनंती केली आहे की, या नामकरणाचा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 8793981432
