Growing Maharashtra

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : गणेश नारंग

महापालिकेच्या आगामी निवडणुका जवळ येत असताना प्रभाग क्रमांक २२, काळेवाडी परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अद्याप उमेदवारांची अधिकृत घोषणा झालेली नसतानाही आयात उमेदवार देण्याच्या चर्चेमुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला दिसून येत आहे.स्थानिक संघटनेत अनेक वर्षे काम करणारे, जनतेशी थेट संपर्क असलेले आणि पक्षाशी निष्ठावंत असलेले ॲड. मंगेश मच्छिंद्र नढे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पक्षाकडून डावलले गेल्यास किंवा आयात उमेदवार लादण्यात आल्यास, वेळ आली तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. “काहीही झाले तरी मी निवडणूक लढवणारच,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, निवडणुकीत केवळ गणित पाहून निर्णय न घेता संघटनेसाठी केलेले सातत्यपूर्ण काम, जनतेतील विश्वास आणि स्थानिक स्वीकारार्हता या बाबी महत्त्वाच्या आहेत.

बाहेरून उमेदवार दिल्यास कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम प्रचार यंत्रणेवर होऊ शकतो, असा इशाराही कार्यकर्त्यांकडून दिला जात आहे.दरम्यान, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने स्थानिक संघटनेशी सखोल चर्चा करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास संभाव्य नाराजी टाळता येईल आणि निवडणुकीत पक्ष अधिक ताकदीने उतरू शकेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

प्रभाग क्रमांक २२ मध्ये ॲड. मंगेश नढे यांना स्थानिक पातळीवर चांगला जनाधार असून, त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली तर राजकीय समीकरणे बदलू शकतात, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!