GROWING MAHARASHTRA
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : गणेश नारंग
पिंपरी-चिंचवड शहरातील अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची घटना समोर आली असून, भोसरी MIDC परिसरात तीन बांगलादेशी नागरिक आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक पातळीवर सतर्कता दाखवत विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी या तिघांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी थेट पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई भोसरी MIDC पोलीस स्टेशन हद्दीत नोंदवण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तिघे एका खासगी कंपनीत काम करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली.चौकशीदरम्यान या व्यक्तींकडे डुप्लिकेट आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच बँक खाते असल्याचा प्राथमिक संशय निर्माण झाला. या बाबत तातडीने पोलिस कंट्रोल रूमला माहिती देण्यात आली. त्यानंतर कोणताही कायदा हातात न घेता, कार्यकर्त्यांनी संबंधित तिघांना अधिकृत तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात सुपूर्द केले.
अर्ज छाननीकडे पत्नी, तर सुरक्षेसाठी पती मैदानात
या संपूर्ण प्रकरणात एक वेगळी आणि लक्षवेधी बाब समोर आली आहे. वॉर्ड क्रमांक 23 मधून भाजपकडून तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या नम्रता रवी भिलारे या महिला उमेदवार अर्ज छाननीचा शेवटचा दिवस असल्याने ग प्रभाग कार्यालयात उपस्थित होत्या. त्याच वेळी त्यांचे पती रवी भिलारे हे 4–5 कार्यकर्त्यांसह आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते कुणाल साठे यांच्यासमवेत 31 डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस रोहिंग्या व बांगलादेशी नागरिकांबाबत माहिती मिळवून कारवाईसाठी सक्रिय होते.
अखेर संध्याकाळच्या सुमारास दोन बांगलादेशी नागरिक आढळून आले. त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी भोसरी पोलिसांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले.
पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, प्राथमिक तपासात संबंधित व्यक्ती बांगलादेशी नागरिक असल्याची पुष्टी झाली आहे. सध्या त्यांचा भारतात प्रवेश कसा झाला, ते किती काळापासून येथे वास्तव्यास होते, तसेच बनावट कागदपत्रे कोणी व कशा पद्धतीने तयार केली, याचा सखोल तपास सुरू आहे.
या प्रकरणामागे कोणते संघटित रॅकेट कार्यरत आहे का, याचाही तपास पोलिस करत आहेत.
या संपूर्ण कारवाईत कुणाल साठे, रोहित सोनवणे, निलेश चासकर, अमोल वारुळे, प्रमोद सोनवणे, कौशल रावल, नवनाथ चाकोरे, संजय शेळके, रवी भिलारे, हरीश चौधरी, युवराज शेलार आणि राजेश चौधरी यांच्यासह बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
दरम्यान, वॉर्ड क्रमांक 23 आणि 24 (थेरगाव परिसर) येथे अवैधरीत्या राहणाऱ्या रोहिंग्या व बांगलादेशी नागरिकांबाबत कायदेशीर मार्गाने कारवाई करून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी प्रयत्न करण्याचा नववर्षाचा संकल्प नम्रता रवी भिलारे यांनी व्यक्त केला आहे.
या घटनेमुळे शहरातील सुरक्षा, बेकायदेशीर स्थलांतर आणि बनावट कागदपत्रांच्या गैरवापराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता कायद्याच्या चौकटीत राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, या प्रकरणाचा अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
