Growing Maharashtra : पुणे ग्रामीण प्रतिनिधी
इंदापूर, दि. १७ ऑगस्ट २०२५: इंदापूर तालुक्यातील मौजे दगडवाडी येथील श्री नंदिकेश्वर मंदिरात आज ५ कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात पार पडले. पण हा सोहळा महायुतीतील भारतीय जनता पक्ष (भाजपा) साठी डोळ्यांत तिखट मिरची टाकणारा ठरला. स्थानिक आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने हा कार्यक्रम एकहाती रेटत भाजपाला निमंत्रणाचा कागदही पाठवला नाही. यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे, आणि भाजपाची अवहेलना झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये पसरली आहे.
कॉन्सीलवर राष्ट्रवादीची मक्तेदारी, भाजपाला खड्ड्यात
उद्घाटन सोहळ्याच्या कॉन्सीलवर फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची नावे ठळकपणे झळकत होती, तर महायुतीतील प्रमुख मित्रपक्ष असलेल्या भाजपाचा नामोनिशाणही नव्हता. दगडवाडी पंचक्रोशीत भाजपाचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सक्रिय असताना त्यांना जाणीवपूर्वक डावलण्याचा हा प्रकार आहे की भरणेंचा एकतर्फी डाव, असा सवाल उपस्थित होत आहे. “महायुतीचा आत्मा इंदापूरात कुठे आहे? की भरणे एकटेच सगळं चालवताहेत?” अशी तिखट प्रतिक्रिया स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.
२ जुलै २०२३ पासूनच भाजपाची उपेक्षा
२ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांनी महायुतीत प्रवेश करत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले, तेव्हापासून राष्ट्रवादी आणि भाजपा एकत्र असल्याचा दावा केला जातो. पण इंदापूरात गेल्या दोन वर्षांत झालेल्या एकाही विकासकामाच्या उद्घाटनात किंवा कार्यक्रमात भाजपाच्या स्थानिक नेत्यांना बोलावण्याची तसदी भरणे यांनी घेतली नाही. विकासकामांचे श्रेय एकहाती लाटत राष्ट्रवादीची पताका फडकवण्यात भरणे यांनी कोणतीही कसर ठेवली नाही, तर भाजपाला मूकदर्शक बनून राहावे लागले आहे. “इंदापूरात महायुती नावाची गोष्टच नाही,” अशी खरमरीत टीका एका भाजपा कार्यकर्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर केली.
भाजपाचे नेते गप्प का? हतबलता की अंतर्गत कमजोरी?
भरणे यांच्या या एकतर्फी कारभारावर भाजपाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते चिडाऊनही गप्प का आहेत, हा प्रश्न तालुक्यात गाजत आहे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष असल्याची कुजबुज आहे, पण कोणीही उघडपणे आवाज उठवत नाही. “भरणेंनी आम्हाला जणू हद्दपार केलंय, पण आमचे नेते शांत का, हे समजत नाही,” अशी खंत एका स्थानिक कार्यकर्त्याने व्यक्त केली. भाजपाची ही हतबलता आहे की अंतर्गत कमजोरी, याबाबत तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
प्रवीण माने यांच्या प्रवेशानेही चित्र जैसे थे
प्रवीण माने यांच्या नुकत्याच झालेल्या भाजपा प्रवेशाने तालुक्यात पक्षाला नवसंजन मिळेल, अशी आशा होती. पण माने यांच्या आगमनानंतरही भाजपाची अवस्था बदललेली नाही. भरणे यांच्या वर्चस्वापुढे माने यांचा प्रभावही फिका पडला आहे. या मुद्द्यावर माने यांनी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही, ज्यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
“माने आले, पण भरणेंनी सगळ्यांना गप्प बसवलं,” अशी कडवट टीका स्थानिकांमधून ऐकायला मिळत आहे.
इंदापूरात महायुती की भरणेंची एकलकोंडी?
दत्तात्रय भरणे यांच्या या एकतर्फी वर्तनाने इंदापूरातील महायुतीच्या एकजुटीला काळीमा फासला आहे. दगडवाडीच्या उद्घाटनाने हा वाद चव्हाट्यावर आला असून, भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप खदखदत आहे. भरणे यांचा हा खेळ तालुक्यातील राजकीय समीकरणे आपल्या हातात ठेवण्याचा आहे की स्वतःच्या वर्चस्वाचा डंका पिटण्याचा, हे येणारा काळ ठरवेल. पण एक गोष्ट नक्की, इंदापूरच्या राजकारणात भाजपाला मिरची लागली आहे, आणि तीही तिखटातली तिखट!

[…] इंदापूरात भाजपाची अवहेलना: दत्तात्रय… हे हि वाचा […]
[…] इंदापूरात भाजपाची अवहेलना: दत्तात्रय… […]
[…] इंदापूरात भाजपाची अवहेलना: दत्तात्रय… […]