
Growing Maharashtra : इंदापूर प्रतिनिधी
महाराष्ट्राचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील दगडवाडी येथे आयोजित एका कार्यक्रमात जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. “प्रस्थापितांना डावलून जनतेने शेतकऱ्याच्या मुलाला संधी दिली, ही जाणीव माझ्या मनात आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मी कटिबद्ध आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.रविवारी, दगडवाडी येथील श्री नंदिकेश्वर अभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना भरणे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांशी आपली जवळीक असल्याचे नमूद केले. “सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना मला शेत दिसते. शेतकऱ्यांच्या अडचणी मला माहीत आहेत. त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी मी नंदकेश्वराची शपथ घेऊन सांगतो, की मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन,” असे त्यांनी सांगितले.
विकासकामांना गती, शेतकऱ्यांसाठी योजना
इंदापूर तालुक्यात गेल्या काही वर्षांत झालेल्या विकासकामांचा दाखला देत भरणे यांनी सांगितले, की तालुक्यात एवढी विकासकामे झाली आहेत, की पाच वर्षे रोज उद्घाटने केली तरी ती कमी पडतील. नीरा नदीकाठच्या संरक्षण भिंतीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती देत त्यांनी या कार्यक्रमातच त्याचे भूमिपूजन केले. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळवून देण्यासाठी विशेष उपाययोजनांवर सरकार कार्यरत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
विरोधकांवर टीका, जनतेशी बांधिलकी
विरोधकांवर नाव न घेता टीका करताना भरणे म्हणाले, “काही लोक निवडणुकीपुरते येतात आणि नंतर गायब होतात. मी तुमच्या सुख-दु:खात नेहमी सोबत आहे.” गावातील वाद बाजूला ठेवून शेतकरी आणि गरीबांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आवाहन त्यांनी केले. मंत्रिपदाच्या जबाबदाऱ्यांमुळे राज्यभर फिरावे लागत असले, तरी जनतेच्या मनात आपण कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या यशोगाथांचा गौरव
कार्यक्रमात भरणे यांनी शेतकऱ्यांच्या यशोगाथांचा उल्लेख केला. शेळगाव येथील बापूराव दुधाळ यांच्या डाळिंब बागेचे उदाहरण देत, कष्ट आणि योग्य नियोजनातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांना यश मिळत नाही, त्यांच्यासाठीही सरकार प्रयत्नशील राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
