Growing Maharashtra : मुंबई प्रतिनिधी

मुंबई, 1 सप्टेंबर 2025: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी अटींसह आणखी एका दिवसाची परवानगी दिली आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा देताना म्हटले आहे की, “आंदोलक माघारी गेले तर आमदार-खासदारांचे फिरणे मुश्किल होईल. मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे.” त्यांनी सरकारला ‘पोटजात, उपजात’ म्हणून आरक्षण देण्याचा सल्ला दिला असून, ‘सरसकट’ हा शब्द वापरण्याचे टाळण्याचे आवाहन केले आहे.

सीएसएमटी परिसरात नाकाबंदी, वाहतूक कोंडी
आंदोलनामुळे मुंबईच्या सीएसएमटी परिसरात तणावाचे वातावरण आहे. जे.जे. फ्लायओव्हरवर नाकाबंदी करण्यात आली असून, मुंबई महापालिका समोरील मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून.

नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. गणेशोत्सव आणि पावसामुळे आधीच शहरातील रस्त्यांवर ताण आहे, आणि आता या आंदोलनामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

त्यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:

  1. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे.
  2. मराठा-कुणबी एक असल्याची अंमलबजावणी करावी.
  3. हैदराबाद, सातारा आणि मुंबई गॅझेटियर लागू करावे.
  4. सगेसोयरे धोरणाची अंमलबजावणी करावी.

सरकारची भूमिका काय?
जरांगे पाटील यांच्या सल्ल्यावर आणि मागण्यांवर सरकार कोणती भूमिका घेणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. यापूर्वी सरकारने काही मागण्या मान्य केल्या होत्या,

परंतु ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा मुद्दा कायदेशीर पेचामुळे अडकला आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी जरांगे यांनी उपोषण कडक करण्याचा निर्णय घेतल्याने सरकारवरील दबाव वाढला आहे.

आंदोलनाचा सामाजिक आणि राजकीय परिणाम
या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. कल्याण, लातूर, अहमदनगर यासह विविध भागांतून आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याच्या बाटल्या पाठवण्यात येत आहेत.

मात्र, या आंदोलनामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था कोलमडली असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय, काही राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध दर्शवला आहे, तर काहींनी समर्थन दिले आहे, ज्यामुळे राजकीय वातावरणही तापले आहे.

बातमी आणि जाहिरातसाठी संपर्क : ९०११६३९१६३

One thought on “सविस्तर अपडेट : मराठा आरक्षण आंदोलन : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली, सीएसएमटी परिसरात नाकाबंदी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!