Growing Maharashtra पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : गणेश नारंग
अतिवृष्टी आणि पुरामुळे मराठवाड्यासह राज्यातील शेतकरी बांधवांवर संकट कोसळलं. शेती, जनावरे आणि संसार उद्ध्वस्त झाले… पण त्यांच्या जिद्दीला सलाम करत भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे यांनी “एक हात मदतीचा – गोधन दान” हा अनोखा उपक्रम राबवला आहे.मोशी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात झालेल्या या कार्यक्रमात पूरग्रस्त शेतकऱ्यांना शंभर गाईंचं दान देण्यात आलं.
कार्यक्रमाचे उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र दादा चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यांनी या उपक्रमाला “संवेदनशीलतेचा उत्सव” असं संबोधत सांगितलं “शेतकऱ्यांची सेवा म्हणजे राष्ट्रसेवा. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य उमटवणं हेच आमचं ध्येय आहे.”या गोधन दानातून अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्यात पुन्हा नव्या आशेचा किरण उजळला.

लातूर जिल्ह्यातील शेतकरी रामराव देशमुख भावनिकपणे म्हणाले — “पूरात सगळं वाहून गेलं… घर, शेती, जनावरं. पण आज या गोधनानं पुन्हा जगायचं बळ मिळालं. आमचं घर पुन्हा गोकुळ होईल असं वाटतंय.”कार्यक्रमात गोधनाची व्यवस्था आणि सेवा करण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील अनेक गौसेवक आणि समाजसेवक पुढे आले.
पिंपरी चिंचवड मधील गोरक्षक कुणाल साठे आणि निलेश चासकर यांनी सांगितलं — “गाई ही केवळ जनावर नाही, ती शेतकऱ्याच्या आयुष्याचा पाया आहे. गोधन दानातून आपण त्याचं जगणं परत देतो.”माजी महापौर राहुल जाधव यांनी या संकल्पाचं कौतुक करत म्हटलं — “शेतकऱ्यांच्या अडचणीत उभं राहणं म्हणजे खरं राष्ट्रनिर्माण.

आजचा कार्यक्रम ही समाजसेवेची खरी व्याख्या आहे.”गोधन दानानंतर अनेक शेतकरी भावनिक झाले. काहींच्या डोळ्यांत अश्रू होते, पण त्या अश्रूंमध्ये दिलासा आणि नवजीवनाचं प्रतिबिंब होतं. “गाय दान म्हणजे केवळ गोसेवा नाही — तर नवजीवनाचं दान आहे,” असं एका शेतकऱ्याने सांगितलं.“एक हात मदतीचा – गोधन दान” या उपक्रमातून केवळ जनावरांचं नव्हे, तर शेतकऱ्यांच्या मनाचं पुनरुज्जीवन झालं आहे — आणि समाजातील संवेदनशीलतेचा सुंदर संदेश पुन्हा एकदा उजळून निघाला आहे.
या कार्यक्रमाला भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघन बापू काटे भाजपचे अनेक नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते
