Growing Maharashtra पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : गणेश नारंग
पिंपरी चिंचवड परिसरात आज सकाळी उघडकीस आलेल्या घटनेने शहरभर खळबळ उडाली आहे.
सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या पतीचा त्याच्याच पत्नीच्या हातून निर्घुण खून झाल्याची धक्कादायक घटना चिंचवड परिसरात घडली असून, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मृत व्यक्तीचे नाव नकुल आनंद भोईर (वय ४०) असून, आरोपी पत्नीचे नाव चैताली नकुल भोईर असे आहे.
पहाटेच्या सुमारास दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला. वाद वाढत गेला आणि रागाच्या भरात चैतालीने नकुलचा गळा आवळून त्याचा जीव घेतला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
नकुल भोईर हे पिंपरी चिंचवड परिसरात सामाजिक कार्य, स्थानिक प्रश्न आणि जनतेच्या अडचणींमध्ये नेहमी पुढे असणारे नाव होते.मराठा क्रांती मोर्चा, विविध सामाजिक संघटना आणि जनआंदोलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. गरीब-गरजूंच्या मदतीसाठी ते नेहमी धावत असत.
त्यांनी आपल्या पत्नीला पुढील महापालिका निवडणुकीत नगरसेविका बनवायचं स्वप्न पाहिलं होतं.
“घरातूनच समाजकार्यात हातभार लागावा,” अशी त्यांची भूमिका होती. पण नियतीने वेगळाच खेळ खेळला —
जिला उंचावर नेण्याचं स्वप्न पाहिलं, तिच्याच हातून आयुष्य संपलं.
या दाम्पत्यामागे दोन लहान मुले आहेत. वडिलांचा जीव गेला, आई पोलिसांच्या ताब्यात — आणि या दोन निरागस जीवांचं भवितव्य आता समाजावर आहे, अशी हळहळ सर्वत्र व्यक्त केली जाते आहे.
परिसरातील नागरिक, मित्रपरिवार आणि सहकारी आज स्तब्ध आहेत. “संवेदनशील, प्रामाणिक आणि जनतेसाठी झटणारा कार्यकर्ता आज कायमचा गेला,” अशा शब्दांत सर्वांनी नकुल भोईर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
संशय, राग आणि अहंकार — या तिघांनी मिळून एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त केला. नकुलचा मृत्यू केवळ एका व्यक्तीचा नाही, तर संवेदनशील समाजभावनेचा अंत आहे.
आज प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे — “संशयाचं ओझं इतकं जड असू शकतं का, की ते प्रेम आणि आयुष्य दोन्ही गिळून टाकेल?”
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क👇🏻
✒️ गणेश नारंग (पिंपरी चिंचवड) प्रतिनिधी :- 📱8793981432
