GROWING MAHARASHTRA
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : गणेश नारंगपिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी प्रभाग क्रमांक २२ मध्ये राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. भाजपने तिकीट नाकारल्यानंतरही संघर्ष न थांबवता ॲड. मंगेश नढे यांनी थेट मैदानात उतरण्याचा निर्णायक पवित्रा घेतला आहे.“खिंच के ताण, धनुष्यबाण” असा आक्रमक नारा देत त्यांनी शिवसेना कडून अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला.
गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्ष मध्ये निष्ठेने काम करत असताना स्थानिक पातळीवर जनतेशी थेट संपर्क, सामाजिक प्रश्नांवरील लढे आणि कायदेशीर सहाय्याच्या माध्यमातून ॲड. नढे यांनी आपली ठाम ओळख निर्माण केली होती. मात्र तिकीट वाटपात स्थानिक नेतृत्वाला डावलण्यात आल्याने पक्षांतर्गत असंतोष उफाळून आला. अखेर हा अन्याय सहन न करता त्यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.
उमेदवारी अर्ज दाखल करताना ॲड. नढे यांनी,“आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, पण तो दबणार नाही. ही लढाई सत्तेसाठी नव्हे, तर सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी आहे,” असे ठणकावून सांगत आपली भूमिका स्पष्ट केली.यावेळी त्यांच्या समर्थकांनी जय श्री राम, जय शिवराय, जय भीम अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.या घडामोडीमुळे प्रभागातील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, भाजपसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे येथील निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
