Growing Maharashtra
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : गणेश नारंग
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात महत्त्वाची हालचाल पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आगामी महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढवणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे.
तळवडे येथे झालेल्या पक्षाच्या प्रचार सभेत त्यांनी याबाबत थेट संकेत दिले.प्रचाराचा शुभारंभ करताना अजित पवार म्हणाले की, निवडणुका जरी उशिरा होत असल्या तरी कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळेच आपण स्वतः मैदानात उतरल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत त्यांनी आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, पूर्वी या भागात उद्योग होते, मात्र नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव होता. रोजगारासाठी लोक येथे येत होते, पण वास्तव्यासाठी पुण्याचा आधार घ्यावा लागत होता. पुढील काळात विकासकामांना गती मिळाल्याने शहरात मोठा बदल झाला, असा दावा त्यांनी केला.आपल्या कामकाजाविषयी बोलताना त्यांनी मागील निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाल्याचे सांगितले.
त्या वेळी संबंधित भागातून संपूर्ण पॅनल निवडून आल्याचा उल्लेख करत त्यांनी सध्याच्या राजकीय ताकदीकडे लक्ष वेधले. सध्या शहरात तीन आमदार असून भविष्यात हा आकडा वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड महापालिका एकेकाळी आर्थिकदृष्ट्या सक्षम होती.
दीर्घकाळ सत्ता असूनही महापालिका कर्जबाजारी झाली नाही आणि आपल्या कार्यकाळात कोणताही भ्रष्टाचाराचा डाग लागलेला नाही, असा दावा त्यांनी केला.सध्याच्या प्रशासनावर टीका करत त्यांनी टेंडर प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याचा आरोप केला. ठराविक लोकांनाच कामे दिली जात असून यामुळे विकासकामांवर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. शहराची लोकसंख्या वाढत असताना कोणत्याही प्रकारची दहशत, गुंडगिरी किंवा गैरव्यवहार सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
आळंदी आणि देहू या तीर्थक्षेत्रांच्या विकासाबाबत अपेक्षित प्रगती न झाल्याची खंत व्यक्त करत त्यांनी दूरदृष्टीच्या नेतृत्वाचा अभाव असल्याचे मत मांडले. शहराच्या गरजा लक्षात घेता बंद पाइपलाइनसारख्या महत्त्वाच्या योजनांसाठी सक्षम महापालिका आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी शहरातील महिलांना सुरक्षित वातावरण मिळाले पाहिजे, असे सांगितले.
यासाठी पोलिस यंत्रणेने अधिक सतर्क राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.तळवडे परिसरात सुरू असलेल्या जैवविविधता प्रकल्पाचा उल्लेख करत त्यांनी शहराला आर्थिक अडचणीत नेणाऱ्या प्रवृत्तींविरोधात कठोर भूमिका घेण्याचा इशारा दिला.
उमेदवारांचे जागावाटप लवकरच जाहीर केले जाईल, त्यामुळे कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, असेही त्यांनी सांगितले.भविष्यात पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाल्यास आवश्यक ते कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे स्पष्ट करत अजित पवार यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
