मुंबई, दि. 26 ऑगस्ट 2025: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची तयारी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दणका दिला आहे. मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास हायकोर्टाने मनाई केली आहे. मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, नवी मुंबईतील खारघर किंवा अन्यत्र आंदोलनाला परवानगी देण्याची मुभा राज्य सरकारला देण्यात आली आहे.या निर्णयामुळे जरांगे यांची डोकेदुखी वाढली असून,आता ते पुढे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अंतरवालीत दाखल,जरांगेंनी ठाम भूमिका कायम
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे,या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गणेशोत्सव काळात मुंबईत उपोषणाला येण्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर, आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) राजेंद्र साबळे यांनी अंतरवाली सराटी येथे जरांगे यांची भेट घेतली. उपोषण पुढे ढकलण्याची विनंती आणि मुंबई मोर्चाचा मार्ग जाणून घेण्यासाठी ही भेट घेण्यात आल्याचे साबळे यांनी सांगितले. मात्र, जरांगे यांनी आपली ठाम भूमिका कायम ठेवत, “मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही,”असे स्पष्ट केले. “मुंबईला निघण्याआधी सरकारने आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा, तरच आम्ही माघार घेऊ,”असे जरांगे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
जरांगेंच्या मुंबई मोर्चाचा मार्ग काय ?
मनोज जरांगे यांनी काल पत्रकार परिषदेत मुंबई मोर्चाचा मार्ग जाहीर केला होता. ते म्हणाले, “27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून निघून छत्रपती संभाजीनगर,अहिल्यानगर,खेड,चाकण,पुणे,लोणावळा, वाशी आणि चेंबूरमार्गे आम्ही आझाद मैदानात पोहोचणार आहोत.27ऑगस्टला रात्री आमचा मुक्काम किल्ले शिवनेरीवर असेल.तिथे माती कपाळी लावून 28 ऑगस्टला शिवनेरीहून मुंबईकडे निघू आणि सायंकाळी आझाद मैदानात पोहोचू.”मात्र, हायकोर्टाच्या ताज्या निर्णयामुळे आझाद मैदानात आंदोलन शक्य होणार नसल्याने जरांगे यांच्यासमोर नव्या आव्हानांचा डोंगर उभा राहिला आहे.
हायकोर्टाच्या निर्णयामुळे कोंडी
मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयामुळे जरांगे यांची कोंडी झाली आहे.आझाद मैदानात आंदोलनाला मनाई झाल्याने आता ते खारघर किंवा अन्य पर्यायी ठिकाणी आंदोलन करतील का, याबाबत उत्सुकता आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता असून,जरांगे यांची पुढील रणनीती काय असेल, हे लवकरच स्पष्ट होईल.सरकार आणि आंदोलक यांच्यातील तणाव वाढत असताना,येत्या काही दिवसांत या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

[…] […]