Growing Maharashtra प्रतिनिधी : गणेश नारंग
‘स्मार्ट सिटी’चा दर्जा मिळवलेली आणि एकेकाळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून नावाजलेली पिंपरी चिंचवड महानगरपालिका सध्या कचरा व्यवस्थापनाच्या मूलभूत सेवेत अपयशी ठरत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातील कचरा वाहतूक गाड्या बंद पडल्याने सफाई कर्मचाऱ्यांना त्या गाड्यांना धक्का देत सुरू कराव्या लागत आहेत, असे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
शहरातील पिंपरी गाव परिसरात ही परिस्थिती विशेषतः गंभीर असून, काही ठिकाणी तर दुसऱ्या कचरा गाडीने बंद पडलेल्या गाडीला ढकलून सुरू करण्याचे प्रकारही घडले आहेत. या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
करांच्या कोट्यवधी रकमेमुळेही ‘मेंटेनन्स’ ठप्पमहापालिकेकडून दरवर्षी नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांचा कर आकारला जातो. त्याचबरोबर कचरा गाड्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठीही दरवर्षी करोडो रुपयांची टेंडर प्रक्रिया राबवली जाते. तरीसुद्धा या गाड्यांची अशी अवस्था का झाली आहे, हा प्रश्न नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
“आरोग्य विभागाने जबाबदारीने लक्ष द्यावे” — सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळेया संदर्भात युवा सामाजिक कार्यकर्ते सुहास सुनंदा साहेबराव कुदळे यांनी संताप व्यक्त करताना सांगितले, “महापालिका नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांचा कर आकारते. आरोग्य विभागाकडून नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित अशा सेवांवर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.
जर गाड्यांची वेळेवर देखभाल केली असती, तर आज अशी स्थिती निर्माण झाली नसती.”महापालिका प्रशासनाचे मौन प्रश्नांकितया प्रकरणावर महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, नागरिकांचा प्रश्न सरळ आहे — “स्मार्ट सिटी म्हटल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये अशा अस्मार्ट गाड्या किती दिवस चालणार?”
