Growing Maharashtra : नाशिक प्रतिनिधी
नाशिक, १७ नोव्हेंबर २०२५: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात सोमवारी दुपारी घडलेल्या भयावह घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिच्या डोक्यावर दगड मारून तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास ही चिमुकली गावात घरासमोर इतर मुलांसोबत खेळत होती. त्यानंतर ती बेपत्ता झाल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. संध्याकाळी साडेपाच वाजता गावालगतच्या शेतात तिचा निर्जीव देह आढळून आला. पोस्टमॉर्टम अहवालात बलात्काराची पुष्टी झाली असून, डोक्याला मोठ्या दगडाने वार करून हत्या केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करताच, खेळत असलेल्या इतर लहान मुलांनी सांगितले की, “विजय काका” तिला घेऊन गेला होता. यावरून पोलिसांनी गावातीलच २४ वर्षीय विजय संजय खैरणर याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला. प्राथमिक तपासात हा गुन्हा मुलीच्या वडिलांशी झालेल्या किरकोळ भांडणाचा बदला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच संतप्त गावकरी व नातेवाईक रस्त्यावर उतरले.
मालेगाव-कुसुंबा रोडवर रस्तारोको करत त्यांनी आरोपीला तत्काळ फाशी देण्याची मागणी केली. मृतदेह ताब्यात घेण्यासही त्यांनी नकार दिला. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते. मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक कार्यरत असून, आरोपीला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
या घटनेने बालसुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत “अशा विकृत मनोवृत्तीच्या गुन्हेगारांना समाजातून हद्दपार करावे” अशी मागणी केली आहे.
(बातमी सध्या उपलब्ध असलेल्या अधिकृत माहितीवर आधारित आहे.)
