Growing Maharashtra

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : गणेश नारंग

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळेवाडी प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपकडून उमेदवारांची नावे अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेली नसतानाच, बाहेरून म्हणजेच ‘आयात’ उमेदवार देण्याच्या चर्चेने स्थानिक निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ही बाब सध्या चर्चेपुरती मर्यादित असली तरी, अशा चर्चांमुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असून, कोणत्याही परिस्थितीत आयात उमेदवार देऊ नये, अशी ठाम मागणी निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.पक्षासाठी अनेक वर्षे निष्ठेने काम करणारे, प्रत्येक निवडणुकीत झेंडा खांद्यावर घेऊन प्रचारात सक्रिय राहणारे स्थानिक कार्यकर्ते सांगतात की, उमेदवारी ठरवताना त्यांच्या कामाची, योगदानाची आणि स्थानिक पातळीवरील स्वीकारार्हतेची दखल घेतली गेली पाहिजे. उमेदवारांची नावे अद्याप स्पष्ट नसताना आयात उमेदवारांच्या चर्चेला हवा दिली जात असल्याने कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास डळमळीत होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.“आम्ही फक्त सतरंज्या उचलण्यासाठीच आहोत का?” असा थेट सवाल अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात येत असून, संघटन मजबूत ठेवायचे असेल तर स्थानिक कार्यकर्त्यांनाच संधी दिली पाहिजे, अशी त्यांची ठाम भूमिका आहे. आयात उमेदवार देण्यात आल्यास पक्षांतर्गत नाराजी वाढून त्याचा थेट परिणाम निवडणुकीतील कामगिरीवर होऊ शकतो, असा इशाराही कार्यकर्त्यांकडून देण्यात येत आहे.दरम्यान, निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे अपेक्षेने पाहिले असून, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक संघटनेचा आवाज ऐकावा, अशी स्पष्ट मागणी केली जात आहे. सध्या केवळ चर्चा सुरू असली तरी, याच टप्प्यावर योग्य निर्णय घेतला गेला तर भविष्यातील संभाव्य वाद टाळता येतील, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!